तुळशी विवाह मराठी माहिती (Tulasi vivaah information in marathi)

तुलसी विवाह: मराठी माहिती



परिचय:

हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस ही प्रत्येक शुभकार्यात वापरली जाते. तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो. हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. तुळशी सोबत भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपातील अवताराशी या दिवशी विवाह लावला जातो. असे केल्याने जीवनात सकारात्मकता येते. चला तर या लेखात जाणून घेऊया तुळशी विवाहाचे महत्त्व, परंपरा आणि आख्यायिका याबद्दल. 

तुळशी विवाहाचे महत्त्व: 

तुळशी विवाह हा विष्णुंचा तुळशीशी विवाह लावण्याचा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळस या वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम रुपातील विष्णु किंवा त्याचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह लावणे. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. ती लक्ष्मीची स्वरूप मानली जाते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी होय. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात आणि चतुर्मास संपतो. तेव्हा त्यांचे तुळशीशी लग्न करतात. विष्णुंच्या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एक तंत्राने एकत्रित करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून महत्त्व आहे. म्हणून श्री विष्णूचा तुळशीशी विवाह कार्तिक द्वादशीला करतात.  

हे पण वाचा- धनत्रयोदशी मराठी माहिती 2023

तुळशी विवाह आख्यायिका:

कांची नगरीत कनक नावाचा राजा होता. त्यांना एक मुलगी होती तिचे नाव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून एका ज्योतिषाने सांगितले कि जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडुन तो मरेल. त्यामुळे ब्राह्मणाने किशोरीला विष्णु मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करून तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे त्याने सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली. राजकुमारी किशोरीवर गंधी व राजकुमार मुकुंद हे दोघे मोहित झाले होते. मुकुंद हा सूर्याची उपासना करायचा. सूर्याने मुकुंदाच्या स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले कि तु किशोरीबरोबर लग्न करु नको तिचा नाद सोडून दे कारण तिच्याशी लग्न करणारा वीज पडून मरेल. तेव्हा  मुकुंद सूर्याला म्हणाला तुमच्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. पण मी किशोरी शिवाय जगू शकणार नाही. तेव्हा सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. त्यावेळी कनक राजाने या विवाहाला मान्यता दिली. कार्तिक द्वादशी ही विवाहाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. त्यामुळे त्यांनी ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याप्रमाणे त्यांनी राजकुमारी किशोरीचा हात धरला. त्याचवेळी मेघगर्जनेसह विजा कडाडल्या आणि गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला. यानंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने तिचे वैधव्य टळले.

तुळशी विवाह मराठी माहिती (Tulasi vivaah information in marathi) 

दुसरी आख्यायिका अशी आहे की प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस होता. तो खूप वीर आणि पराक्रमी होता. तो सगळीकडे खूप उत्पात करत होता. त्याच्या या धाडसा मागे एक कारण होते ते म्हणजे त्याची पत्नी वृंदा हिचा पतिव्रता धर्म.ती मथुरेच्या कालनेमी या दैत्य राज्याची मुलगी असते. ती लहानपणापासुनच प्रभू विष्णुची भक्त असते. जशी ती मोठी होते तसं तिचं लग्न जालंधर या राक्षसाशी करण्यात येते. जालंधराबद्दल असे आहे की एकदा राजा इंद्र आणि शंकर यांच्यात लढाई सुरू होते. शंकर रागाने आपला तिसरा डोळा उघडतात. परंतु देवाचे गुरु बृहस्पती मध्यस्थी करून शंकराला विणवणी करतात की यातून कोणताही विध्वंस घडवू नका इंद्राला माफ करा. शेवटी त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व तेथे आग सोडली त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आले तोच हा जालिंदर त्याच्यासाठी एक राज्य ही निर्माण करण्यात आले. 

वृंदेने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केले. जेव्हा तो युद्धाला जायचा त्यावेळेस ती पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत ती तेथून हलायची नाही. त्यामुळे प्रत्येक युद्धात त्याला जीवनदान आणि विजय मिळत असायचा. यामुळे तो सर्वव्यापी असतो. जालंधरा च्या उत्पातामुळे समस्त देव प्रभू विष्णुकडे मदत मागतात. पण लक्ष्मीने त्यांच्याकडून एक वचन घेतलेले असते ते म्हणजे भगवान विष्णू जालंदरला मारणार नाहीत कारण लक्ष्मी ही सुद्धा समुद्राचीच कन्या होती. त्यामुळे ती जालंधरला भाऊ समजत होती. जालंदर तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. 

जालिंदर चा वध करण्यासाठी देवाने दुसरा पर्याय शोधून काढला तो म्हणजे शंकरच जालिंदर चा वध करू शकत होते. परंतु ते स्वतःहून युद्ध करणार नव्हते म्हणून त्यांनी नारदाची मदत घेण्याचे ठरवले. नारदाने मदत करण्याचे मान्य करून ते जालंधर ला भेटायला गेले नारद यांनी जालिंदरला सांगितले की तुमच्याकडे सर्व काही आहे. पण कैलास पर्वत नाही आहे. त्याचबरोबर  त्यांनी पार्वतीच्या सुंदरतेचे वर्णन देखील केले. या हव्यासापोटी जालिंदर कैलास पर्वतावर चालून गेला यामध्ये शंकर आणि जालिंदर चे घनघोर युद्ध सुरू झाले. 

वृंदेच्या पुजेमुळे जालिंदर चा वध करता येत नव्हता. जालंदरला कोणतेही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध सुरू असताना जालिंदर शंकराचे रूप घेऊन पार्वतीकडे जातो. पार्वती शंकराच्या रूपातील जालिंदरला ओळखते आणि त्याच्यावर हल्ला करते तसा जालंधर पळून जातो. मग पार्वती विष्णूकडे जाते आणि म्हणते जालंधर ने आता मला जसा फसवायचा प्रयत्न केला तसा तुम्ही वृंदे बरोबर करा. 

हे ऐकुण श्रीविष्णू जालंधर चे रुप घेऊन वृंदाचे पतिव्रता धर्मभंग करण्याचे ठरवतात. इकडे वृंदा आपल्या पतीच्या विजयासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत बसलेली असते. जालिंदर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नसते. वृंदा ही विष्णुची निसिम भक्त असल्यामुळे विष्णूंना तिला फसवायचे नसते. परंतु इकडे युद्धात त्याची हार होणे गरजेचे असते. मग शेवटी विष्णू जालिंदर चे रूप घेतात आणि वृंदा जिथे पूजेला बसलेली असते तिथे जातात. जालंदरला पाहुन वृंदा पूजेवरून उठते. आणि त्यांच्या पाया पडते. यामध्ये तिची पुजा भंग होते. वृंदेचे सतीत्त्व नष्ट झाल्यामुळे शंकरा बरोबर युद्ध करत असताना जालंदराचा मृत्यू होतो. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी ती क्रोधित होऊन प्रभू विष्णूना श्राप देते की ज्याप्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे. त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असा श्राप त्यांनी विष्णुना दिला. आणि वृंदा पती सोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी एक झाड उत्पन्न झाले. त्याला विष्णूंनी तुळस असे नाव दिले. ही घटना कार्तिक महिण्यात घडली म्हणून या दिवसात तुळशी विवाह केला जातो. 

एका इतर आख्यायिकेप्रमाणे वृंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझा छळ करून तुम्ही माझे सतीत्व भंग केले. त्यामुळे तुम्ही दगड बनाल. त्या दगडाला शालिग्राम असे म्हटले जाते. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. श्री विष्णू तिला सांगतात की तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनुन माझ्या सोबत राहशील. तुळस प्रत्येक घरात लावली जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. मला जे काही अर्पण केले जाईल त्यावर तुळशी पात्र ठेवले जाईल. 

माझ्यासोबत तुझा विवाह लावण्याऱ्यास पुण्य लाभेल. तेव्हापासून तुळस आणि शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेतून जागे होतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपात तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाह करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की जो कोणी तुळशी विवाहाचे आयोजन करतो. त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि ते करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्या जोडप्यांना मुली होत नाहीत त्यांनी एकदा तरी तुळशीचा विवाह करावा असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच तुळशीचा विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशी विवाह केल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत नाहीत. 

तुळशीचा विवाह कसा करावा:

तुळशी विवाहासाठी प्रथम तुळशीचे रोप तुमच्या घरातील अंगणात ठेवले जाते.कुंडीला चुन्याने रंगरंगोटी केली जाते. नंतर तुळशीच्या कुंडीवर उसाचा मंडप सजवला जातो. तुळशीला हार, फुलांनी सजवले जाते. नंतर तुळशीभोवती रांगोळी काढून तिला एखाद्या नवरी सारखे नटवले जाते. त्यानंतर तिला लाल वस्त्र अर्पण करून त्या कुंडीत बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात इ. ठेवले जाते. त्यानंतर श्री विष्णूंचे आव्हान करून त्यांना जागे केले जाते. त्यानंतर बाळकृष्ण व तुळस दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. त्यानंतर तुळशीचे कन्यादान करून आरती म्हटली जाते. आणि सगळ्यांना प्रसाद वाटला जातो. यंदा तुलसी विवाह 24 नोवेंबर 2023 रोजी आहे.

मित्रांनो वृंदेची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की वृंदा आपल्या नवऱ्यासाठी त्याच्या सुखासाठी, दीर्घ आयुष्याशासाठी इतकी झटत होती तर आपल्या नवऱ्याने चांगले काम करावे. यासाठी तिने प्रयत्न का केले नाहीत. पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पाहिले तर तुळस ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी घराघरात तुळस असावी असा विचार केला असावा. ही औषधी वनस्पती आहे. घराघरात लावावी असं म्हणून सांगितलं असतं तर कोणी लावली नसती पण तुळशीला धार्मिक महत्त्व आहे असे सांगितले तर ते सर्वांनी केले असते त्यामुळेच तुळशी विवाह लावून तुळशीचे महत्त्व जपले गेले असावे. 

तुळशीचे आरोग्यविषयक फायदे:

आयुर्वेदामध्ये तुळशीला रोगनाशक समजले जाते. दररोज तुळशीची दोन-तीन पाने चावून खाल्ल्याने आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. पारंपारिक आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळशीला त्याच्या आध्यात्मिक मूल्याच्या पलीकडे एक आदरणीय स्थान आहे. तुळस ही औषधी गुणांसाठी ओळखली जाते. तुळस रोग प्रतिकारशक्ती वाढवते. तुळशी विवाहाचा एक भाग तुळशीच्या रोपाची लागवड आणि काळजी ही एक सर्वांगीण प्रथा आहे. ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम मिळतात.

हे पण वाचा- दिवाळी भाऊबीज मराठी माहिती 2023

तुळशी विवाह मंगलाष्टक तसेच विवाह मंगलाष्टक:

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
 
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।
शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी|
पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।
 
लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।
गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।
अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।
 
रामो राजमणी सदा विजयते रामम्।
रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।
रामाय तस्मै नमः।
रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।
रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।
 
राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।
आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।
रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।
 
लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।
सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।
गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।
 
विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।
सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।
तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।
 
आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुछ मंगल सावधान।।८।।

निष्कर्ष:

तुलसी विवाह हा विधी नाही हा निसर्ग देवत्व आणि मानवाच्या अस्तित्वातील गहन संबंधाचा उत्सव आहे. आपले सण उत्सव साजरा करण्यात आपण आपल्या पर्यावरणाचा ही समावेश करतो. 

लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात तुळशी विवाह मराठी माहिती याचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे तुळशी विवाह मराठी माहिती बद्दल अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.