सिंधुताई सपकाळ - अनाथांची माई मराठी माहिती (Sindhutai Sapkal - Orphan's Mother Marathi Information )

सिंधुताई सपकाळ - अनाथांची माई मराठी माहिती Sindhutai sapkal information in marathi



दुसरो का दु:ख बांट लो खुद का दु:ख 

      अपने आप भूल जाओगे ! 

                       - सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेखनीय प्रवास: लवचिकता आणि करुणेचे प्रतीक

परिचय:

सिंधुताई सपकाळ ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या आणि समाजसेविका होत्या. ज्यांनी महिलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि अनाथ मुलांचा सांभाळ केला. सिंधुताई सपकाळ यांची कथा एक प्रेरणास्त्रोत आहे. "अनाथांची आई" किंवा "माई" म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुताई सपकाळ यांचे जीवन लवचिकता, धैर्य आणि अमर्याद करुणेची एक उल्लेखनीय कथा आहे. तिचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ज्यानी असंख्य इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एका स्त्रीची शक्ती दाखवली आहे.

प्रारंभिक जीवन:

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात झाला.  तिचे सुरुवातीचे जीवन दारिद्र्य आणि गरिबी मध्ये गेले. लहान वयात तिचे लग्न झाले होते. तिच्या पतीने आणि कुटुंबाने तिला घरातून बाहेर काढले तेव्हा तिच्या आयुष्याला एक दुःखद वळण मिळाले.  या घटनेने तिच्या विलक्षण प्रवासाची सुरुवात झाली.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म: 

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे येथे सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झाला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म अभिमन्यूजी साठे या गुराख्याच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव चिंधी ( फाटलेल्या कापडाचा तुकडा)(टोपणनाव) असे ठेवले. त्यांच्या वडिलांना सिंधुताई ने शिकावे असे वाटत होते. आणि सिंधुताईनाही शिकण्याची खूप इच्छा होती. सिंधुताईंचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत. त्यांची गरिबी इतकी होती की पाटी विकत घेण्याचे ही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्या झाडाच्या पानावरती लिहीत असायच्या.

सिंधुताई सपकाळ यांना गरिबी,बालविवाह व कौटुंबिक जबाबदारी यामुळे इयत्ता चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. त्यानंतर सिंधुताईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. जे त्यांच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठे होते. पूर्वीच्या काळी मुलींचा विवाह कमी वयात होत असे.लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवन जगावे लागले. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात त्याच्या सासरी राहायला गेल्या. 

हे पण वाचा- विजयादशमी दसरा 2023 मराठी माहिती

सिंधुताईंना पुढे शिकण्याची आवड होती. परंतु सासरी शैक्षणिक वातावरण नव्हते. तेथे त्यांना प्रचंड सासुरवास भोगावा लागला. जंगलातून लाकूडफाटा आणणे. शेण गोळा करणे इत्यादी सिंधुताई कामे करत होत्या. त्यावेळी सापडलेले कागदाचे तुकडे सिंधुताई घरी आणायच्या आणि त्याला उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या. आणि त्या घरी एकट्या असताना त्या वाचत बसायच्या. हे त्यांच्या सासरच्या लोकांना आवडत नसे. 

सिंधुताईंची विसाव्या वर्षापर्यंत तीन बाळंतपणे झाली होती. सासरी त्यांना गुरे राखणे हाच व्यवसाय असायचा. त्याना व तेथील इतर बायकांना गुरांचे शेण काढावे लागत असे.पण या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले, दमडाजी व सावकार करायचे. रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरी मिळत होती पण गुरांचे शेण काढणाऱ्या बायकांना मजूरी मिळत नव्हती. शेणाचा लिलाव देखील सावकार दमडाजी आणि जंगल अधिकारी हे करत होते. त्यामुळे येथे सिंधुताईंनी बंड पुकारले.त्यांनी त्यांची तक्रार जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली. यामध्ये सिंधुताईंना न्याय मिळाला. त्यामुळे या लिलावात दमडाजी, सावकार यांना हप्ता मिळायचा बंद झाला. 

संकटावर पाय देऊन उभे राहा कारण  एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवेल - सिंधुताई सपकाळ

सिंधुताईंच्या या बंडाने सावकार दमडाजी दुखावले गेले. सिंधुताईंचे धैर्य व साहस त्यांना बघवले नाही. याचा बदला म्हणून दमडाजीने अफवा पसरवली की सिंधुताई च्या पोटातील मुल हे आपले आहे. यावेळी सिंधुताई चौथ्यांदा गर्भवती होत्या. सिंधुताईंच्या चारित्र्याबद्दल त्यांच्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण केला गेला. त्यामुळे सिंधुताईंच्या नवऱ्याने त्यांना मारहाण करून घरातुन बाहेर काढले. आणि त्यांना गोठ्यात ठेवले तेथे त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हा एका गाईने दुसऱ्या जनावरांपासून त्यांचे रक्षण केले. तेथेच त्यांच्या पोटी कन्या जन्माला आली. तेव्हा त्या गाईला कवठाळून रडू लागल्या. ज्याप्रमाणे तू आईप्रमाणे माझे रक्षण केलेस तसे मी तुझे आई बनुन रक्षण करणे. हे वचन सिंधुताईंनी गाईला दिले. त्याप्रमाणे वर्धा मध्ये गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा येथे गोपालन सुरू केले. येथे त्या 175 गाईचा सांभाळ करतात. 

विसाव्या वर्षी नवऱ्याने तिला सोडून दिले. त्याच्यानंतर गावकऱ्यांनीही तिला हाकलले. म्हणून ती माहेरी आली तर माहेरी आल्यानंतरही त्यांना आईने घेतले नाही. त्यामुळे त्या रेल्वे स्टेशनवर आल्या आणि तेथे त्या आपल्या व आपल्या मुलीच्या उदरनिर्वाहसाठी भीक मागू लागल्या. तेथेही त्या मिळालेली भीक एकट्या खात नसत तर सर्व भिकाऱ्यांना एकत्र घेऊन खात असत. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. परंतु रेल्वे स्टेशनवर दोन दिवस काहीच भीक न मिळाल्याने आणि आपल्या व आपल्या मुलीच्या रक्षणासाठी त्यांनी स्मशान गाठले. तेथे त्या आपली भूक भागवण्यासाठी प्रेतावर आलेल्या पिठाची भाकरी बनवून खात असत. तसेच कोणाकडे भजन असेल तर तेथे जाऊन ते भजन म्हणत असत आणि तेथेच जेवत असत. अशाप्रकारे त्यांचा उदरनिर्वाह त्या करत असत. 

एकदा जळगाव मधील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण आपल्या लहान मुलीचा विचार करून त्या मागे फिरल्या. या संघर्षमय काळात त्यांना असे समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरवले की जो कोणी अनाथ त्यांच्याकडे येईल त्याचा सिंधुताई आई म्हणून सांभाळ करतील. 

या अनुभवामुळे निराधारांबद्दल तिची सहानुभूती आणखी वाढली. तिने अनाथ अर्भकांना घेऊन त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. कालांतराने तिच्या देखरेखीखाली मुलांची संख्या वाढतच गेली आणि ती लवकरच असंख्य अनाथांची आई झाली.

सिंधुताई सपकाळ - अनाथांची माई

सिंधुताई सपकाळ यांना 'अनाथांची माई' म्हणून देखील ओळखले जाते. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवाडा या गावात त्यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. सिंधुताईंनी आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या सेवा सदन येथे शिक्षणासाठी दाखल केले कारण त्यांना असे वाटत होते की अनाथ मुलांच्या बरोबर आपल्या मुलीला ठेवले तर आपल्या मधील आई जागी होऊ शकते आणि मग अनाथ मुले व आपली मुलगी यांच्यात भेदभाव होऊ शकतो. अशा प्रकारे त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनल्या. त्यानंतर त्यांनी बाल सदन मध्ये  अनाथ मुलांना आधार दिला. येथेच त्यांनी अनाथ मुलांना शिक्षणाबरोबरच जेवण, कपडे व अन्य सुविधा ही संस्थेकडून दिल्या. येथे मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे त्या युवक व युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्य ही संस्थेकडून केले गेले. अशी सुमारे 1050 मुले या संस्थेने दत्तक घेतली.आणि दत्तक मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिली. 

बरीच मुले आता प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत. आणि अनाथ आश्रम चालवत आहेत. जे सिंधुताईंना माय म्हणून संबोधतात. आज त्यांच्या कुटुंबात 282 जावई आणि 49 सुना आहेत आणि 1000 पेक्षा जास्त नातवंडे तसेच 175 गाई आहेत. सिंधुताईंचे पती 80 वर्षाचे झाल्यावर ते त्यांच्याकडे राहायला आले. परंतु सिंधुताईंनी त्यांना आपला पती म्हणून नाही तर मुलगा म्हणून स्वीकारले. 2016 मध्ये सिंधुताईंना सामाजिक कार्यासाठी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च मधून साहित्यात डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे.   

लाख जमानेभरकी डिग्रीया हो तेरे पास लेकिन अपनों की तकलीफ ना पड सके तो अनपढ हे तू - सिंधुताई सपकाळ

सिंधुताईंनी स्थापन केलेल्या संस्था

1.बाल निकेतन हडपसर पुणे

2.सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे

3.अभिमान बालभवन वर्धा

4.सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा

5.ममता बाल सदन सासवड

6.गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा (गोपालन) 

सिंधुताईंचा मृत्यू

सिंधू ताईंना डायफ्रामॅटिक हार्निया हा आजार होता. यामुळे त्यांच्या डाव्या बाजूचे फुफ्फुस व्यवस्थित रित्या कार्य करीत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती. परंतु त्यानंतर थोड्या दिवसांनी फुफुसाचा संसर्ग वाढला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. परंतु त्यावेळेसच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 8 वाजून १० मिनिटांनी पुण्याच्या गॅलेक्सी केअर या दवाखान्यांमध्ये वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सिंधुताईंची अशी इच्छा होती की मरणोत्तर त्यांना दहन करणे ऐवजी महानुभव पंथाच्या रितीरिवाजा नुसार त्यांना जमिनीत दफन करण्यात यावे. आणि त्यानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या दफनविधीची कल्पना केलेली कविता दगडाला सुद्धा पाझर फोडणारी आहे. 

मला जाळू नका, जमिनीत गाडून टाका! 

खरंच मी जेव्हा जमीन दोस्त होईल 

सोबत काय येईल, मागे काय राहील? 

दुर्दैवाने खडक फोडले 

दुःख जहाल मूर्तीमंत, उभ आयुष्य गेलं 

ना खेद ,ना खंत

ह्यातूनच नवी पहाट, उद्याचं स्वप्न पाहिलं 

अनेकांना जवळ केलं, देताल तेवढे दिलं 

आता थकले रस्ते, मन ही खुणावते धीरे आस्ते

संपेल आयुष्याचे तेल, पणती विझुन जाईल

सातपुडा उरी फुटेल

चिखलदऱ्याचा धीर सुटेल

वासरांच्या गाई हंबरतील

पशुपक्षी 'भैरवी' गातील

स्तब्ध होतील वादळ वारे

कडे कपारी आणि झरे

दुरावलेल्या भाग्याचे मला 'अहेव' लेण येईल

मातीचा पदर पांघरून मला 'धरती' पोटात घेईल! 

सिंधुताईंची कथा ही करुणेच्या शक्तीचा पुरावा आहे. तिने दत्तक घेतलेल्या मुलांसाठी विविध संस्थांच्या मार्फत अन्न शिक्षण आणि निवारा यांची सोय केली. त्यांच्या हितासाठी तिची अतूट बांधिलकी काही कमी नव्हती. तिचा ठाम विश्वास होता की प्रत्येक मुलाला प्रेम, काळजी आणि चांगले जीवन मिळण्याची संधी मिळायला हवी आणि तेच प्रदान करणे हे तिने आपल्या जीवनाचे ध्येय बनवले.सिंधुताईंनी निधी मिळवण्यासाठी देशभरात प्रवास केला. तसेच परदेशातून निधी मिळवण्यासाठी ग्लोबल फाउंडेशन संस्था स्थापन करून प्रदेशातूनही निधी मिळवला. 

कायदेशीर लढाया आणि विजय

सिंधुताईंचा अविश्वसनीय प्रवास अडथळ्यांशिवाय नव्हता. तिला विविध स्तरांतून कायदेशीर लढाया आणि प्रतिकारांचा सामना करावा लागला. पण तिने धीर धरला. तिची लवचिकता आणि  समर्पण यामुळे अखेरीस अनाथ आणि सोडलेल्या मुलांसाठी अनेक अनाथ आश्रमे उभारली गेली. तिच्या अथक प्रयत्नांना जगभरातील व्यक्ती आणि संस्थांकडून मान्यता आणि पाठिंबा मिळाला.अशा अनेक खडतर समस्या व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनाथांचे संगोपन केले व त्यांना आईचे प्रेम दिले. 

मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कळालेच नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्याचे चटके पटकन कळाले- सिंधुताई सपकाळ

पुरस्कार आणि सन्मान

सिंधुताई सपकाळ यांच्या विलक्षण कार्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. ज्यात नारी शक्ती पुरस्कार, भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तिची कथा डॉक्युमेंटरी आणि पुस्तकांचा विषय आहे.

सिंधुताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. त्यातले काही

1.आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशन चा दत्तक माता पुरस्कार (1996) 

2.दैनिक लोकसत्ता चा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार (2008) 

3.सीएनएनआयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रियल हिरो पुरस्कार (2012) 

4.महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012) 

5.पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुरस्कार (2012) 

6.महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार (2010) 

7.मूर्तिमंत आईसाठी चा राष्ट्रीय पुरस्कार (2013) 

8.प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015) 

9.डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017) 

10.पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार

11.पद्मश्री पुरस्कार (2021) 

सिंधुताई सपकाळ यांच्यावरील चित्रपट

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे. 

या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियर साठी 54 व्या लंडन चित्रपट महोत्सवात निवड करण्यात आली आहे

सिंधुताईंच्या जीवनावर भार्गव फिल्म अँड प्रोडक्शन चा 'अनाथांची यशोदा' या नावाचा अनुबोधपट 16-2-2014 रोजी  प्रदर्शित झाला आहे. 

रात्रीच्या अंधाराला घाबरू नका

पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही उजाडेल- सिंधुताई सपकाळ

प्रेमाचा वारसा

सिंधुताई सपकाळ यांचे जीवन हे एका व्यक्तीच्या अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या सामर्थ्याचा दाखला आहे. तिचा वारसा एक स्मरणपत्र आहे जो अगदी कठीण परिस्थितीतही आपल्या सहनशीलतेचा, अन्याय विरुद्ध लढण्याचा आणि सामर्थ्याचा दाखला देतो. तिची कथा आपल्याला गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देते.

हे पण वाचा- नवरात्र उत्सव 2023 मराठी माहिती

निष्कर्ष

सिंधुताई सपकाळ यांचे जीवन आशा, प्रेम आणि अतूट निश्चयाची कथा आहे. तिने स्वतःच्या संघर्षातून असंख्य मुलांच्या जीवना मध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणले. सिंधुताईंचे जीवन एक प्रेरणास्थान आहे. एक आठवण आहे की प्रतिकूल परिस्थितीत आपण आपल्या साठी व सर्वांसाठी मार्ग उजळवू शकतो.

सिंधुताईंचा जीवन प्रवास हा खूपच खडतर आणि संघर्षमय होता. जगण्यासाठीची धडपड, प्रतिकूल परिस्थिती, अन्नासाठीची धडपड, आईची व्यथा, कुणाचाही आधार नसणे हे खूप भयानक होते. तरीसुद्धा न डगमगता त्यांनी परिस्थितीला तोंड दिले हे अनुभवत असताना निराधारांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना पुढे पुढे नेत होती.

माणूस कधीच वाईट नसतो

माणसाच्या पोटाची भूक वाईट असते. 

                            सिंधुताई सपकाळ

आदरणीय माईंना

                      भावपूर्ण श्रद्धांजली💐

लक्ष्य द्या:

मित्रांनो वरील लेखात आपण सिंधुताई सपकाळ यांचेबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुमच्याकडे सिंधुताई सपकाळाविषयी अजून काही माहिती असेल किंवा या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास तर कमेंट किंवा ई-मेल करून सांगावे. जेणेकरून यामध्ये अपडेट करता येईल. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

धन्यवाद 

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.