पन्हाळा किल्ला- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तु


पन्हाळा किल्ला: महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील एक बलाढ्य किल्ला

 

पन्हाळा किल्ला

भारतातील महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या शिखरावर उंच आणि अभिमानाने उभा असलेला पन्हाळा किल्ला हा एक ऐतिहासिक चमत्कार आहे.जो पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना सारखाच इशारा देतो.भव्य तटबंदी आणि समृद्ध वारसा लाभलेल्या पन्हाळा किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष स्थान आहे. या प्राचीन किल्ल्याची भव्यता जाणून घेण्यासाठी आणि शतकानुशतके जतन केलेल्या मनमोहक कथांचा शोध घेण्यासाठी आपल्या लेखाला सुरुवात करूया.

पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या  किल्ल्याची उंची 4 हजार 40 फूट इतकी आहे. आणि हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो. किल्ल्याच्या सभोवती सात फूट उंचीच्या भिंती आहेत.ज्या शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ल्यावरील लोकांचे संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या आहेत. हा किल्ला दख्खन पठारावरील सर्वात मोठा किल्ला असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 14 किलोमीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर 500 हून अधिक दिवस राहिले. पावनखिंड लढाईमुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पन्हाळा किल्ल्याचा भूतकाळ 12 व्या शतकातील आहे जेव्हा तो शिलाहार शासक भोज II यांच्याकडून इसवी सन 1178 ते 1209 मध्ये बांधण्यात आला. पन्हाळगड शतकानुशतके यादव, बहामनी, आदिल शाही, मोगलशाही राजवंश आणि मराठ्यांसह विविध राजवंशांच्या हातातून गेला आहे. आणि प्रत्येकाने आपली वास्तुकला आणि इतिहासावर आपली अमिट छाप सोडली.

शिवा काशिद

पन्हाळगडाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्धी जोहर ने आपल्या चाळीस हजार सैन्या सह पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्यावेळेला महाराजांना पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी शिवा काशिद म्हणजेच एका जिगरबाज मावळ्या ने बलिदान दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट सुद्धा या पन्हाळगडावर झाली होती. करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाई ज्यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून याच पन्हाळगडची निवड केली. पन्हाळगडावरून महाराणी ताराबाई यांनी आपला राज्यकारभार चालवला. चला तर मग बघूया करवीर नगरीतील बलाढ्य किल्ले पन्हाळगड

बाजीप्रभू देशपांडे

किल्ले पन्हाळगड या किल्ल्यावर जाताना बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला तीन दरवाजा आहे. जो शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी मुख्य ठिकाणी त्याची रचना केलेली आहे. महाराष्ट्रातील पन्हाळगड हा असा एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्यावरील इमारत व बांधकाम सुस्थितीतील आहे. या किल्ल्याला बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले तसेच त्याचे डागडुजी देखील केली. 1659 मध्ये अफजलखानाच्या वधानंतर केवळ अठरा दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला होता. आदिलशहाने पुन्हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सिद्धी जोहरला पाठवले. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. तेव्हा शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफिने स्वतःची सुटका करून घेतली. आणि ते विशाळगडाकडे गेले. बरोबर बाजीप्रभू देशपांडे व 600 बांदल मावळे होते. शत्रूला चकवा देण्यासाठी महाराजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशीद हे महाराजांच्या वेशात दुसऱ्या मार्गाने निघून गेले. सिद्धी जोहरच्या सैन्याला वाटले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हाती लागले आहेत. पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते. सिद्धी जोहरने महाराजांना कधी पाहिले नव्हते. पण अफजलखानाच्या मुलाने त्यांना पाहिले होते. त्यामुळे शिवा काशिद पकडला गेला आणि मारला गेला. पकडले गेलेले शिवाजी महाराज नाही हे कळल्यावर सिद्धी जोहरचे सैन्य महाराजांच्या मागावर गेले. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड पकडून ठेवली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. पण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मावळ्यांना सोडून पुढे जाऊ वाटेना तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समजावले. ते म्हणाले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे यांनी सांगितले की तुम्ही विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफेचे तीन आवाज करा तोपर्यंत गनिमी ला आम्ही रोखून धरतो. त्यानंतर महाराज विशाळगडाकडे जायला निघाले. महाराज विशाळगडावर पोहचल्यावर ठरल्याप्रमाणे तोफेचे तीन आवाज झाले. तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते. आणि तेथेच त्यांना वीरमरण आले. बाजीप्रभू देशपांडे व सर्व बांदल मावळे यांच्या रक्तांनी खिंड पावन झाली म्हणून तिला पावनखिंड असे नाव देण्यात आले. 

तीन दरवाजा

तीन दरवाज्याच्या  वरच्या बाजूला एक विहीर आहे या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. तीन दरवाज्याच्या जवळच एक वास्तू आहे ती म्हणजे अंधार बावडी. ही वस्तू तीन मजल्यांची आहे त्यातील पहिल्या मजल्यावर पहारेकरांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे. दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे. आणि तळमजल्यावर एक विहीर आहे पन्हाळगडावरील ही विहीर सुरक्षित आहे. ज्यावेळी कोणताही शत्रू हल्ला करत असे त्यावेळी तो तिथे असणाऱ्या विहिरीमध्ये विष कालवत होता हे टाळण्यासाठी आदिलशहाने अंधार बावडी बांधली आणि त्यामध्ये सैन्य देखील तैनात केले. येथे जवळच अंबर खाना आहे. जेथे गंगा यमुना सरस्वती अशी भली मोठी धान्याची कोठारे आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोटारांचा वापर केला जात असे. यात वरी, नागली, भात, असे सुमारे 25000 खंडी इतके धान्य मावत असे. धान्य साठवून ठेवण्याची ही सुरक्षित जागा होती. पन्हाळगडावर देवी अंबाबाई मंदिर आहे. पन्हाळगडाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे इसवी सन 1673 साली स्वराज्याचे शूर-शिलेदार कोंडोजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकला होता.  पण त्या अगोदर सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हा पन्हाळगड सिद्धी जोहरच्या ताब्यात द्यावा लागला होता. नंतर कोंडोजी फर्जंद यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला होता. 

अंधार बावडी 

पन्हाळगडावर एकूण 22 गुहा आहेत. त्यांना पराशर गुहा असेही म्हणतात.  तेथून जवळच भगवान शंकराचे मंदिर आहे. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरीशुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते. या मंदिराच्या बरोबर समोर महाराणी ताराबाई यांचा राजवाडा आहे. ज्या ठिकाणाहून महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे. महाराणी ताराबाईंच्या राजवाड्यात  सध्या लहान मुलांची शाळा भरते. पन्हाळगडावर सज्जा कोटी आहे. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते याच ठिकाणी चालत. याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील लोकांनी संभाजी महाराजांना दोन वेळा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता तसेच या ठिकाणी त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. पन्हाळगडाच्या एका बाजूला भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा नजरेस पडतो. पन्हाळगडावर आपल्याला राज दिंडी पाहायला मिळते राज दिंडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सिद्धी जोहर ने पन्हाळगडाला वेढा घातलेला त्यावेळी ज्या वाटेने गडाबाहेर गेले त्या वाटेला राजदंडी म्हणतात. विशाळगडावर जाण्यासाठी ही एकमेव वाट होती. पन्हाळगडावर एक मोठे तलाव आहे त्याला सोमाळे तलाव म्हणतात. पन्हाळगडावर बाराही महिने पाण्याची सोय व्हावी यासाठी दगडामध्ये कुंड केलेला होता त्याला नागझरी म्हणतात. सरकारातील धान्य गरजूंना दान केले जायचे त्या स्थानाला धर्म कोटी म्हणायचे. पन्हाळगडावर शिवा काशिद यांचा पुतळा देखील पाहायला मिळतो

 पन्हाळा किल्ला विविध शासक राजवंशांच्या प्रभावामुळे विविध वास्तुशैलींचे मिश्रण प्रदर्शित करतो.  किल्ल्याचे मोक्याचे स्थान अंदाजे ४०४० फूट उंचीवर असलेने आजूबाजूच्या लँडस्केपचे विस्मयकारक विहंगम दृश्य प्रदान करते.

तटबंदीमध्ये मोठ्या दगडी भिंती, बुरुज आणि टेहळणी बुरूज आहेत जे त्याच्या लष्करी महत्त्वाचा दाखला देतात.  तीन दरवाजा, अंधार बावडी, सज्जा कोटी अंबरखाना, अंदर बाव, पराशर गुहा, धर्मकोटी, रेडे महाल, कलावंती महाल, महाराणी ताराबाई यांचा वाडा, सोमेश्वर मंदिर आणि  वाघ दरवाजाची आकर्षक रचना ही किल्ल्यातील काही उल्लेखनीय वास्तुशिल्प रत्न आहेत.  किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा दरबार म्हणून काम केलेली सज्जा कोठी आणि अंबाबाई मंदिर, एक प्राचीन प्रार्थनास्थळ यासारखी ऐतिहासिक वास्तू देखील आहेत.


ऐतिहासिक महत्त्वाव्यतिरिक्त पन्हाळा किल्ला हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेला आहे. ज्यामुळे तो निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्ग बनला आहे. किल्ल्याकडे जाणारे ट्रेकिंग ट्रेल्स एक विलोभनीय अनुभव देतात. वाटेत नयनरम्य लँडस्केप आणि ताज्यातवान्या  पर्वतीय हवेसह मान्सून या ऋतूत भेट देण्याचे आकर्षण वाढवतात. 

हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे महत्त्व ओळखून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग पन्हाळा किल्ल्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत. किल्ल्याची संरचनात्मक अखंडता राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी त्याच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी जीर्णोद्धार उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

पन्हाळा किल्ल्याला भेट देणे हा काळ आणि इतिहासाचा मनमोहक प्रवास आहे. हे भव्य वास्तू पाहण्याचा आदर्श काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हवामान आल्हाददायक आणि ट्रेकिंगसाठी योग्य असते. 


किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्यशास्त्रातील चमत्कारांची माहिती देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक उपलब्ध आहेत.

पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा म्हणून उभा आहे. स्थापत्यशास्त्राच्या भव्यतेच्या पलीकडे किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि चित्तथरारक दृश्ये त्याचे आकर्षण वाढवतात.  पन्हाळा किल्ल्याला भेट देणे ही केवळ भारताच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देण्याची संधी नाही तर निसर्गाशी जोडण्याची आणि त्याच्या प्राचीन भिंतींमधून प्रतिध्वनी करणाऱ्या शौर्य आणि शौर्याच्या कथांमधून प्रेरणा मिळवण्याची संधी देखील आहे. त्यामुळे जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा अनोखा अनुभव शोधत असलेले निसर्गप्रेमी असाल तर पन्हाळा किल्ला निःसंशयपणे तुमच्या प्रवासाच्या बकेट लिस्टमध्ये आला पाहिजे.


वाचा-  जुलियस रॉबर्ट ओपन हायमर - अणुबॉम्बचे जनक


वाचा- जगातील सर्वात मोठे कार्यालय आहे भारतात


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.